अकोला-आकोट गेजपरिवर्तनाचा दिवाळीपूर्वीच श्रीगणेशा!
शिवणी-शिवापूर रेल्वेस्थानकाचा विकास होणार
नांदेड डीआरएम डॉ. ए.के. सिन्हा यांची माहिती
राम देशपांडे■ अकोला
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणार्या मीटरगेज रेल्वे मार्गाच्या गेजपरिवर्तनास राज्य वनविभागाने परवानगी दिली असली, तरी केंद्रीय पर्यावण मंत्रालयाने...
more... अद्याप याबाबतचा निर्णय जाहीर केलेला नाही. रेल्वे प्रशासनाकडे आवश्यक निधी उपलब्ध असून, दिवाळीपूर्वीच अकोला-आकोटदरम्यान गेजपरिवर्तनाच्या कामास निश्चितपणे सुरुवात होणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेचे नांदेड विभागीय व्यवस्थापक (डीआरएम) डॉ. ए. के. सिन्हा यांनी दिली.
अकोल्यातील मध्य आणि द. मध्य रेल्वे मार्गाच्या कनेक्टिव्हिटीचा मार्ग प्रशस्त करण्याच्या मूळ उद्देशाकरिता ते बुधवारी अकोल्याला आले होते. अकोला-खंडवा मीटरगेज रेल्वे मार्गाच्या गेजपरिवर्तनाकरिता केंद्राने आवश्यक निधी उपलब्ध करून दिला असून, तीन टप्प्यांत त्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात अकोला ते आकोट, दुसरा आकोट ते अमडापूर व तिसर्या टप्प्यात अमडापूर ते खंडवा या भागातील रेल्वे मार्गाचे गेजपरिवर्तन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणार्या रेल्वे मार्गाच्या गेजपरिवर्तनाचा प्रश्न प्रारंभीपासूनच कळीचा मुद्दा ठरला होता. खा. संजय धोत्रे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे त्यास राज्य वन विभागाने परवानगी दिली. मात्र, केंद्रीय पर्यावण मंत्रालयाने अद्याप याबाबत निर्णय राखून ठेवला आहे. पहिल्या टप्प्यातील तीन मुख्य रेल्वे पुलांच्या उभारणीसाठीची निविदा प्रक्रिया मध्यंतरीच्या काळात पूर्ण झाली असून, त्याही कामाला सोबतच सुरुवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेजपरिवर्तनादरम्यान मीटरगेजची जुनी यंत्रणा पूर्णत: आकोटला हलविण्यास त्यांनी यावेळी नकार दिला. गेजपरिवर्तनादरम्यान मीटरगेज रेल्वे मार्गावरून वाहतूक चालू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. शिवणी-शिवापूर रेल्वेस्थानकाचा विकास होणार ■ वाशिम, नांदेड आणि दक्षिणेतील इतर ठिकाणी जाणार्या प्रवाशांना संपूर्ण शहर पालथे घालून दक्षिण मध्य रेल्वेस्थानक गाठावे लागते. वाढत्या शहरीकरणाबरोबरच याच मार्गावर असलेल्या शिवणी-शिवापूर या रेल्वेस्थानकाचा विकास होणे गरजेचे आहे. उत्पन्न वाढीच्या दृष्टिकोनातून शिवणी-शिवापूर रेल्वेस्थानकाचा लवकरच विकास करण्यात येणार असून, दक्षिणेकडे जाणार्या सर्वच प्रवासी गाड्यांना या रेल्वेस्थानकावर थांबा देण्याचा विचार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मात्र, सध्या गेजपरिवर्तनालाच प्राथमिकता देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.